मुंबई: भोंग्याविरोधात मोहीम हाती घेणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत महाराष्ट्र सरकारवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलंच सुनावलं आहे. ‘आपण महाराष्ट्रात राहतो’, असं म्हणत, अजित पवारांनी राज ठाकरे यांना राज्याच्या परंपरेची आठवण करून दिली आहे.

उत्तर प्रदेशात योगी सरकारनं धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याची मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्रात हाच मुद्दा हाती घेणाऱ्या राज यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून योगींचं कौतुक केलं आहे. तसंच, महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात कुणीच योगी नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी,’ असं राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अधिक वाचा  म्हणून पुण्यातील राज ठाकरेंची नियोजित सभा रद्द

राज यांच्या या टीकेबद्दल अजित पवार यांना आज पत्रकारांनी विचारलं असता त्यांनी कुणाचंही नाव न घेता सरकारची भूमिका मांडली. ‘योगींनी उत्तर प्रदेशमध्ये काय करावं, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे. सुसंस्कृत, सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सर्व जातीधर्मांना न्याय देणारा महाराष्ट्र अशी या राज्याची परंपरा आहे, असं अजित पवार म्हणाले.

‘इतके वर्ष हे सर्व चालत आलेलं आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवलं होतं. आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टानं काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. भावनेच्या आहारी जाऊन समाजात तेढ निर्माण करायची आणि भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातील जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सुरू आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात पेरण्याचं काम करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही. हे सर्वांनी गांभीर्यानं घेण्याची व मनाचा मोठेपणा दाखवण्याची गरज आहे. यातून काही अनुचित घटना घडल्या आणि त्यातून जखमा झाल्या तर नको ते प्रश्न निर्माण होतील, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.