पुणे : गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या. यात काही अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बदली केली गेली. या बदल्यांमध्ये पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचाही समावेश आहे. त्यांनी शनिवारी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी न बोलता कृष्ण प्रकाश तिथून निघून गेले होते. आपल्या बदलीबद्दल ते संभ्रमात असल्याची चर्चा आहे. दरम्याना, कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवरून सूचक पोस्ट करत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.

कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करून व्हीआयपी सुरक्षा पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या तडकाफडकी बदलीमुळे त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा आहे. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये शायरी पोस्ट केली आहे.

अधिक वाचा  संभाजीराजे राज्यसभेच्या शर्यतीतून माघारीची शक्यता वाढली; सकाळीच पोस्ट ट्वीट बांधिलकी जनतेशी...

कृष्ण प्रकाश यांनी इन्स्टाग्रामवर शायरी पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, ‘मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है! मेरा लहू मेरे रगो मैं इमान का रंग भरता है! ऐ दौर की दुश्वारिया युं न इतरा मेरे हालात पे! वक्त तो वक्त है, आता और जाता है!,’ बदल्यांच्या आदेशाला अजून आठवडा झालेला नाही. त्यातच कृष्ण प्रकाश नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता या शायरीचा संबंध त्यांच्या नाराजीशी जोडला जात आहे.

गेल्या आठवड्यात गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच कृष्ण प्रकाश यांची पिंपरी चिंचवड पोलिस आय़ुक्त पदापवरून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती केली गेली. बदल्या कऱण्यात आल्या तेव्हा कृष्ण प्रकाश हे परदेशात होते.