नागपूर : अकोला जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयाने राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शिरेंद्रन पुंडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला.

बुधवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४०५, ४२०(फसवणूक), ४६८(खोटे कागदपत्रे तयार करणे), ४७१(खाेट्या कागदपत्रांचा वापर करणे) नुसार कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर आता कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. ‘या प्रकरणात आपण दोषी आढळलो तर वंचितच्या कुठल्याही नेत्यांच्या समोर स्वतःचे हात कलम करेन’, असा पुनरुच्चार पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला. तसेच या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

अधिक वाचा  भारतीय बॅडमिंटनपटूंचे ऐतिहासिक 'सुवर्ण'; पंतप्रधान मोदींकडून १ कोटींचं बक्षीस जाहीर!

वाचा सविस्तर नेमकं प्रकरण काय? अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रस्तावात बदल करून मंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी कारवाईसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.

याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले होते. दरम्यान, मंगळवारी याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी देखील योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.