सातारा : भाजप खासदार उदयनराजे भोसले  हे आपल्या बेधडक वक्तव्याने ओळखले जातात. अनेकदा ते त्यांनी केलेल्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतात. मात्र ते नेहमी राजकीय गोष्टींवर भाष्य करताना बेधडकपणे व्यक्त होतात, म्हणून आक्रमक नेता म्हणून त्यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे.
आता भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन सविस्तर भाष्य केले आहे. सध्या ईडी म्हणजे चेष्टा झाली आहे. त्यांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील असे उदयनराजे भोसले म्हणाले.

याबाबत ते साताऱ्यात कास येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. ‘माझं आवडतं चॅनेल टॉम अॅण्ड जेरी आहे. पण, सध्या मी ते बघायचं बंद केलंय आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत, त्या बघत बसतोय. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतोय, अशा शेलक्या शब्दात उदयनराजेंनी टोमणा मारला आहे.

अधिक वाचा  केतकी चितळेला अट्रॉसिटी गुन्ह्यात अटक: रबाळे पोलिसांच्या ताब्यात; गोरेगाव पोलीस प्रतीक्षेत

पुढे बोलताना त्यांनी म्हंटले आहे की, ‘माझ्या हातात ईडी द्या. मग या सगळ्यांना दाखवतोच. पानपट्टीवर बिडी मिळते ना तशी त्या ईडीची अवस्था झाली आहे. ईडी आली.. ईडी आली.. एकेकाला ताब्यात घेवून चाप लावा.दांडक्याने सडकून काढले पाहिजेत, असे मोठे विधान त्यांनी केले आहे.

तसेच ‘एका बाजूला लोक फुटपाथवर झोपत आहेत. या लोकांना ते दिसत नाही. हे मात्र एकमेकांची पाठ थोपटून जगत आहेत. दोन वर्षे ते जेलमध्ये होते पण त्यांनी काय केले नाही. जे आता जेलमध्ये आहेत त्यांनीही काय केलेले नाही. लोकांना काय डोळे, मेंदू नाही का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मान्यता~मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत.अशातच येत्या काही दिवसांत कारवायांचा सपाटा लागणार असल्याची सूचक वक्तव्य अनेक भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.