बुधवारी पार पडलेल्या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिले होते. मात्र यानंतर उद्धव ठाकरे दोषारोप करत जबाबदारी झटकत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रोखठोक भाषेत उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीत, “राज्याच्या हिताच्या गोष्टी बोलण्याची वेळ येते तेंव्हा काही न बोलणारे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब लगेच राज्य सरकारवर टिका करायला आतुर झालेलेच असतात. राज्य शासनावर टिका करण्याआधी त्यांनी आपल्या कार्यकाळातील पेट्रोल – डिझेलवरील कर रचना बघायला हवी” अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील पेट्रोल डिझेलचे भाव सांगत रोहित पवार यांनी म्हणले आहे की, “आपण सत्तेत असताना पेट्रोल-डिझेलवर जो VAT आकाराला जात होता तोच 25% – 21% स्लॅब आज आकारला जात आहे. राज्य सरकार आकारत असलेल्या सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या कार्यकाळात आकारल्या जात असलेल्या सेसपेक्षा आज आकारला जात असलेला सेस नक्कीच कमी आहे.
इतकेच नव्हे तर, “डिझेलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज डिझेलवर केंद्राचा कर 22 रु आहे तर राज्याचा कर 20 रुपये आहे. त्यामुळं डिझेल दरवाढीसंदर्भात राज्याचा प्रश्नच येत नाही. पेट्रोलवरील कराच्या बाबतीत बोलायचं झालं तर केंद्राचा कर 28 रु आणि राज्याचा कर 32 रु आहे. त्यामुळे इंधन दरवाढीसाठी राज्य सरकारला कारणीभूत ठरवणे पूर्णतः चुकीचे असल्याचे रोहित पवारांनी म्हणले आहे.
यासोबतच, “युपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत जास्त असताना पेट्रोलची किंमत कमी असायची आणि आज भाजपा सरकारच्या काळात कच्च्या तेलाची किंमत कमी असताना पेट्रोलची किंमत मात्र जास्त आहे, हे विपरीतच नाही का? परंतु यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही, कारण… ‘भाजप है तो मुनकीन है.’” अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
दरम्यान “केंद्र राज्याला मदत देताना सापत्न वागणूक देत असल्याची मुख्यमंत्र्यांची तक्रार योग्यच आहे. तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधान साहेबांनी शेजारील गुजरात राज्याची पाहणी करून तत्काळ एक हजार कोटीची मदत दिली आणि आपल्या महाराष्ट्राला मात्र एक रुपयाही दिला नाही. याचं महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून नक्कीच प्रत्येकाला दुःख आहे. भाजप नेत्यांना कदाचित महाराष्ट्रावर झालेल्या अन्यायाबद्दल वाईट वाटले नसावं, नाहीतर त्यांनी नक्कीच राज्याची बाजू मांडली असती.” अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्य म्हणजे, “देशात असलेल्या महागाईला केंद्र सरकार कारणीभूत असताना राज्य सरकारांच्या नावाने टाहो फोडून देशाची परिस्थिती सुधारणार नाही. महागाईवर नियंत्रण मिळवायचं असेल तर आधी किमान महागाई आहे हे तरी केंद्र सरकारने मान्य करावं तरच त्यावर उपाय शोधता येईल. अन्यथा नाही-नाही म्हणत जखम लपवून कधी सेप्टिक होऊन श्रीलंकेसारखी परिस्थिती ओढवेल हे कळणारही नाही, याचं भान केंद्रीय नेतृत्वाने ठेवायला हवं” अशा शब्दात रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.