मुंबई : मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यात जवळपास ११ हजार धार्मिक स्थळांवरचे भोंगे काढण्यात आले. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली. गेल्या चार दिवसात उत्तर प्रदेश सरकारने ही कारवाई केली. या कारवाईबद्दल आता योगी सरकारचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसंच योगींचे अभिनंदन करताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केलीय.
उत्तर प्रदेशातील भोंगे उतरवण्याच्या कारवाईबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे अभिनंदन केले आहे. त्यांनी म्हटलं की, “उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.”
महाराष्ट्रात कुणीच योगी नसल्याचा टोला लगावत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्यांनी म्हटलं की, “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.”
उत्तर प्रदेशात धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्याबाबत आणि आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास ११ हजार भोंगे हटवण्यात आले. तर ३५ हजारांहून अधिक भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित गेली गेली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्याच्या आवाजाबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून ही मोहीम सुरु करण्यात आली.
महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांबाबत राज्य सरकारला इशारा दिला होता. त्यानतंर त्यांनी ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिला होता. यावर राज्य सरकारने आपण भोंगे उतरवू शकत नाही असं सांगितलं. केंद्राने याबाबत निर्णय घेतल्यास आम्ही त्याप्रमाणे लागू करू असंही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं. आता राज ठाकरे यांच्या औरंगाबादला होणाऱ्या सभेबाबतही पेच निर्माण झाला आहे. औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याने सभा कशी होणार असा प्रश्न आहे. तर मनसेनं मात्र ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेल्या वेळेतच सभा होईल असं म्हटलं आहे.