मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केला होता. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला यांच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता राणा यांची चौकशी करणार का असा राऊत यांनी केला होता. त्यावर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका करत युसूफ लकडावाला यांचे लाभार्थी कोण आहेत? याची यादी पाठवणार असल्याचे म्हटले आहे.

कंबोज यांनी या संदर्भातील माहितीचे ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ”युसूफ लकडावाला यांचे लाभार्थी कोण आहेत? मी पुराव्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना यादी देतो. माझा ही जबाब घ्या, वास्तविकता सर्वांना कळली पाहिजे! कोणी किती आणि कधी घेतले?” असेही कंबोज यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  अभिमानास्पद! अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

दरम्यान, याआधीच्या ट्वीटमध्ये कंबोज यांनी काँग्रेसचे माजी खासदार अहमद पटेल, संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख या सगळ्यांचे युसूफ लकडावाला यांच्याशी चांगले संबंध होते, असा आरोप केला होता. संजय राऊत काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही. सलीम जावेदच्या गोष्टी आता राऊत यांनी बंद कराव्या. ज्यांना काही कळत नाही त्यांना राज्यसभेचे इतके वर्ष खासदार कसे काय केले हे उद्धव ठाकरे यांनाच माहिती, असा टोलाही कंबोज यांनी लगावला होता. युसुफ लकडावाला यांच्याकडून राणा दांपत्याने हा फ्लॅट विकत घेतला होता. त्या फ्लॅटचे पैसे त्यांनी लकडावाला यांना दिले, असेही कंबोज यांनी सांगितले होते.