पुणे :  भीमा कोरेगाव हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणाऱ्या सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी आयोगाने पवारांना समन्स बजावला आहे. 1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव-भीमा येथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या प्रकरणात शरद पवार यांनी यापूर्वी लेखी स्वरुपात साक्ष आयोगाला पाठवली होती. या प्रकरणात शरद पवार यांची साक्ष अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात सुद्धा शरद पवार यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. 23 फेब्रुवारी रोजी शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार होती. चौकशी आयोगाकडून शरद पवार यांच्यासोबतच तत्कालीन पुणे पोलीस अधिक्षकांना आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनाही समन्स पाठवण्यात आले होते. पुण्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक सुवेझ हक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे.

अधिक वाचा  OBC आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन ,आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शरद पवारांचा का नोंदवणार जबाब?

शरद पवार यांनी भीमा कोरेगाव येथील हिंसाचार हा संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे भडकल्याचं विधान केलेलं. त्यानंतर या प्रकरणात अॅड प्रदीप गावडे यांनी या प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता चौकशी आयोगाने शरद पवारांची साक्ष नोंदवण्यासाठी त्यांना बोलावलं आहे.