पुणे : शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मेंदू आणि छातीतून दोन बुलेट्स बाहेर काढण्यात आल्याची साक्ष ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी न्यायालयात दिली.

डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉ. तावरे यांची साक्ष व उलट तपासणी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ससूनचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे, डॉ. हरिश ताटिया आणि डॉ. मनोज शिंदे यांनी केले होते. त्यापैकी डॉ. तावरे यांची साक्ष केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी नोंदवली.

अधिक वाचा  खाद्यतेलानंतर आता साखर होणार स्वस्त! .. कारखान्यांना बसणार फटका

डॉ. दाभोलकर यांचा मृतदेह सकाळी अकरा वाजता ससून रुग्णालयातील शवागारात आणण्यात आला. रुग्णालयाच्या नियमावलीनुसार, दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्या गोळ्या बाटलीत सीलबंद करण्यात आल्या आहेत, अशी साक्ष डॉ. तावरे यांनी नोंदविल्याचे विशेष सरकारी वकील सूर्यवंशी यांनी सांगितले.

बचाव पक्षाचे वकील डॉ. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावरे यांची उलटतपासणी घेतली. शवविच्छेदनापूर्वीच्या पंचनाम्यात मृतदेहाच्या उजव्या पायावर आणि नडगीवर जखमा असल्याचे नमूद आहे. शवविच्छेदन करताना या जखमा आढळल्या का, अशी विचारणा बचाव पक्षाच्या वकीलांनी केली. त्यावर शवविच्छेदन करताना या जखमा आढळल्या नाहीत. हा किरकोळ फरक असल्याने त्याबाबत तपास अंमलदारांना सांगितले नाही, असे डॉ. तावरे यांनी न्यायालयात सांगितले.

अधिक वाचा  ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयाकडे वर्ग- सुप्रीम कोर्ट

रुग्णालयाच्या नियमावलीत शवविच्छेदन करताना मृतदेहाची उंची, वजन आणि केसांचा रंग शक्य आहे तिथे नोंदवावे, असे नमूद असताना डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहाचे याबाबतचे तपशील का नोंदविले नाहीत, असा प्रश्‍न पक्षाच्या वकिलांनी डॉ. तावरे यांना विचारला. त्यावेळी शवागारात संबंधित मशिन उपलब्ध नसावे, असे डॉ. तावरे यांनी त्यावर सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा मे रोजी होणार आहे