पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी जाहीर सभा होणार आहे. राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.
त्यामुळे त्यांच्या औरंगाबादच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलं आहे. मनसे भोंग्यांच्या मुद्द्यावरुन ठाम असल्याचं चित्र आहे.

पण राज ठाकरे यांच्या सभांना आता महाविकास आघाडी सरकारमधील तीनही घटक पक्ष रोखठोक उत्तर देण्याची शक्यता आहे. कारण भोंगे आणि हनुमान चालिसाला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा 30 एप्रिलला पुण्यातील अलका टॉकिज चौकात होणार आहे. या सभेला तीनही पक्षांमधील नेते आणि मंत्री उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  वजनदार ने हल्के को.. अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना ट्विटरद्वारे खोचक टोला

राज ठाकरे यांनी याआधी घेतलेल्या सभेमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर मिश्किल पद्धतीत आणि खोचक शब्दांमध्ये टीका केली होती. येत्या सभेतही ते तशाप्रकारची टीका करु शकतात.
विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यावेळी पुण्यातच असणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची औरंगाबादमध्ये सभा आहे. ते पुण्याहूनच औरंगाबादला सभेसाठी जाणार आहेत.