विराणे : लग्नसमारंभ संपल्यानंतर वरासाठी व वधुला सासरी आणण्यासाठी हायटेक चारचाकी वाहनांची व्यवस्था वरपक्ष करत असतो. परंतु, या हायटेक खोट्या प्रतिष्ठेला फाटा देत प्राथमिक शिक्षक उत्तम दासनूर (ता. मालेगाव) यांची कन्या वधू गितांजली व मालेगाव येथील प्रगतिशील शेतकरी हिरामण काळे यांचे पुत्र डॉ. अविनाश यांनी लग्नमारंभ संपल्यावर चक्क बैलगाडी वर घरापर्यंत प्रवास केला. उच्च शिक्षित जोडप्याच्या या पारंपरिक पद्धतीच्या प्रवासाची सर्वत्र चर्चा आहे. वधू गितांजली बी. फार्म तर वर डॉ. अविनाश बीव्हीएसचे शिक्षण झाले आहे.

बैलगाडीचे बैल देखील रंगीबेरंगी रंगांनी सजवले होते. बैलगाडीच्या पुढच्या भागात विविध रंगाच्या फुलांचा गुच्छ करून लावण्यात आले होते. तर बैलगाडीला विविध रंगांच्या फुलांची कमान सजविण्यात आली होती. वर अविनाशने वधू गितांजलीला हात देत बैलगाडीवर बसविण्यास मदत केली. वर व वधू बैलगाडी देखील चालवली. बैलगाडीच्या संपूर्ण प्रवासात वधू व वर उत्साहात होते.

अधिक वाचा  शरद पवार यांच्याकडून राज ठाकरेंनी काहीतरी शिकायला हवं, बृजभूषण यांचा मनसेच्या आरोपानंतर टोला

बैलगाडीवर वधू- वर रस्त्यावरून जात असताना वाहनधारक आपले वाहन थांबवून कुतुहलाने पाहत होते. पादचारी, दुकानदार, तसेच घरातून बाहेर निघत बघ्यांची गर्दी झाली होती. सुमारे पाच किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करत वधू सासरी पोहचली. वराच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्यांनी तोबा गर्दी केली होती. तर ज्येष्ठांना आपल्या लग्नावेळीचा बैलगाडीचा प्रवास आठवत चर्चा करत होते. घरी पोहचल्यावर वधू- वराचे औक्षण करण्यात आले.

लग्न सोहळा पार पडल्यानंतर घरापर्यंत बैलगाडीने जाऊ अशी वधू व वराची ईच्छा होती. त्यामुळे आकर्षक बैल व फुलांनी सजवलेली बैलगाडीची व्यवस्था केली. यामुळे पारंपरिक पद्धतही जोपासली गेली व आधुनिक युगात तरूणांपुढे चांगला संदेश पोहचला.”