मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबत बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर चढे राहिल्याचा आरोप केला होता. पंतप्रधानांच्या या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत, ‘महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ठाकरे यांनी व्यक्त केली. तर नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.
यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून दोषारोप आणि जबाबदारी झटकणे यापेक्षा दुसरे काही करणार तरी आहात का?, असा सवाल करत मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचले होते आता पुन्हा ट्वीट करत ‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर तसेही औषध नाही, असे म्हणत मोदी सरकारने राज्याला काय दिले हे सांगत जीएसटीच्या पैशाची यादीच फडणवीसांनी ट्वीट केली आहे.
फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मुख्यमंत्री महोदय्, ज्यांच्यासोबत तुम्ही सध्या सत्तेत आहात, त्यांच्या संपुआ सरकारने महाराष्ट्राला जे दिले, त्यापेक्षा कितीतरी अधिक नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने महाराष्ट्राला दिले आहे. त्यामुळे ‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर तसेही औषध नसतेच.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे सरकार महाराष्ट्राला पै न् पै देईलच, कारण हे पैसे जुलैपर्यंत द्यायचे असतात. कोरोना काळात केंद्रालाही जीएसटी आला नाही, तेव्हा केंद्राने कर्ज घेऊन राज्यांना पैसे दिले आणि हेही सांगितले की राज्यांना संपूर्ण पैसा दिला जाईल. माझी पुन्हा विनंती आहे, विषय भरकटवू नका. विषय पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा आहे, अशा शब्दात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आज राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करीत आले आहे, मात्र केंद्राने यावर काहीही पाऊले उचलली नाही. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली, ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे,’ अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारवर केली आहे.
दरम्यान, “महाराष्ट्राला केंद्रीय कराच्या ५.५ टक्के रक्कम मिळते. एकूण थेट करात (डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. संपूर्ण देशात सर्वात जास्त म्हणजे १५ टक्के जीएसटी महाराष्ट्रातून गोळा होतो. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे असे असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे,” अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी मोदींना करुन दिली होती. यावर आता फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.