पुणे: येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांचा समाचार घेणार असल्याचं म्हणाले होते. महत्वाचं म्हणजे त्याच दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यावरून राज्य सरकारवरही टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभा केले आहेत. आता या सर्व टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे. पुण्यातील 1 मे रोजीच्या सभेत उद्धव ठाकरे या सर्व टीकेचा आणि विरोधकांचा समाचार घेणार आहेत.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी एनसीएमसी कार्डचं लोकार्पण करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना आपण काडीचीही किंमत देत नसल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. दादागिरी केल्यास ती मोडून काढू असा इशाराही त्यांनी दिला होता. लवकरच जाहीर सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार असल्याचंही मुख्यंमत्र्यांनी सांगितलं होतं.

यावेळी विरोधकांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ”हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं, बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात. मला घंटाधारी हिंदुत्व नको आमचं गदाधारी हिंदुत्व आहे. लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचाय. ज्यांच्या पोटात मळमळत आहे, जळजळत आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यात किती विकास केला हे सांगा, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही.”

अधिक वाचा  उध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलून काहीही उपयोग नाही, ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात सद्गुरूंचे भाष्य

महाविकास आघाडीची 30 एप्रिलला निर्धार सभा

महाविकास आघाडीकडून पुण्यात 30 एप्रिलला संध्याकाळी निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील अलका चौकात ही निर्धार सभा संध्याकाळी होणार आहे. या सभेला राष्ट्रवादीकडून जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसकडून मंत्री यशोमती ठाकूर सहभागी होणार आहेत तर शिवसेनेकडून राज्याच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला आमंत्रण देण्यात येणार आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीत सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आलंय.