लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ ची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. चंद्राला पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ झाले आहेत. सोबतच दौलतराव देशमाने आणि दमयंती देशमाने यांच्यातील वादळ कसं क्षमणार असा पेच प्रेक्षकांसमोर आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या दर्जेदार अभिनयाने सजलेला ‘चंद्रमुखी’ २९ एप्रिल २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मराठी प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. अनेक मराठमोळ्या कलाकारांनीही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु, मराठीसोबतच बॉलिवूड अभिनेत्रींना देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे.

यापूर्वी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला शुभेच्छा दिल्या होता. आता बॉलिवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने ‘चंद्रमुखी’ ला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने ट्विट करत आदिनाथला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियांकाने आदिनाथचं ट्विट रिट्विट करत लिहिलं, ‘आदिनाथ कोठारे तुझं खूप खूप अभिनंदन. २९ एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये ‘चंद्रमुखी’ नक्की पाहा.’ या ट्विटसोबत तिने प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, ट्विट करत दिली माहिती

आदिनाथ आणि प्रियांका एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. प्रियांका आणि आदिनाथ यांची मैत्री एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. आदिनाथने २०१९ आलेल्या ‘पाणी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. प्रियांका आणि तिची आई मधू चोप्रा या चित्रपटाच्या निर्मात्या होत्या. तेव्हापासून प्रियांका आणि आदिनाथ यांची मैत्री कायम आहे. त्यामुळेच आपल्या मित्राच्या चित्रपटासाठी प्रियांकाही उत्सुक आहे.