प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर ‘शेर शिवराज’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडेलकर हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. नुकतंच चिन्मय मांडेलकरने मराठी चित्रपटांचे मार्केट आणि बजेट याबद्दल सविस्तर मत मांडले.

शेर शिवराज या चित्रपटाची टीमने नुकतंच पुण्यातील एका रेडिओ चॅनलशी संवाद साधला. यावेळी त्याने मराठी चित्रपट, त्यांचे बजेट यावर भाष्य केले. त्यासोबतच त्यांनी इतर भाषिक चित्रपटांच्या बजेटबद्दलही माहिती दिली. “मराठीचं मार्केट आणि बजेट हे अजूनही कोटींमध्ये नाही. आपल्यालाही वाटतं की बाहुबली, केजीएफ हे चित्रपट बनवावे, पण त्या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च काही शे कोटीत आहे. मराठीत अजून कोटीच्या मागे हा शे शब्द लागायचा आहे. ते शे देखील एक दिवस लागेल. बाब्या खातो दहा लाडू, पण त्याला देतो कोण अशी मराठीची अवस्था आहे. पण हे चित्र नक्की बदलेल. पण तोपर्यंत चांगलं काम करत राहणं, हे तर नक्कीच आपल्या हातात आहे,” असेही चिन्मय मांडलेकरने म्हटले.

अधिक वाचा  तब्बल 3 कोटी रुपये थकबाकीप्रकरणी तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई

बाहुबली ५०० कोटी, टायगर जिंदा है किंवा पीके २०० कोटी, पुष्पा ४०० कोटी, आरआरआर आणि केजीएफ ५५० कोटी हे आकडे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवर दिसतात. पण या चित्रपटांचे बजेट काही शे कोटींच्या घरात असते. मराठी चित्रपटांचे आता हे दिवस नसले तरी चित्रपट निर्मितीची कल्पकता आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मराठी चित्रपट १०० कोटींच्या घरात जायला वेळ लागणार नाही, असे चिन्मय मांडलेकरने सांगितले.

दरम्यान शेर शिवराज या चित्रपटाने पहिल्या दिवशी दिवसात १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच प्रेक्षकांचा वाढत प्रतिसाद पाहून हा चित्रपट लहान चित्रपटगृहातून मोठ्या चित्रपटगृहातील स्क्रीनवरही प्रदर्शित करण्यात येत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरला आहे.

अधिक वाचा  केतकीचे वय बघता वॉर्निंग देऊन सोडून द्या;पंकजा मुंडेंचे शरद पवारांना आवाहन

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील ‘फर्जंद’ हा पहिला चित्रपट ठरला होता. त्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. यानंतर आता शेर शिवराज हा चौथा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट सध्या चांगलाच हिट ठरताना दिसत आहे.