New Delhi: Home Minister Amit Shah and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis during a meeting at BJP HQ, in New Delhi, Thursday, Sept. 26, 2019. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI9_26_2019_000091B)

मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये सध्या हनिमान चालिसाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि मनसे असा संघर्ष दिसून येत आहे. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्याच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्याने मुंबईतील राजकारणही चांगलेच तापले. या प्रकरणात सध्या राणा दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असतानाच भाजपाने या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्हं उभी केली आहेत. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्यांवर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला झाल्याने या प्रकरणात वादाची नवी ठिणगी पडलीय. याच साऱ्याचा समाचार शिवसेनेनं घेतला असून सध्या भाजपाची आणि भाजपा समर्थकांकडून सुरु असणारा प्रकार पाहून दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, असा खोचक टोला शिवसेनेनं लागवलाय. या शिवाय ‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत,’ अशी टीकाही शिवसेनेनं केलीय

अधिक वाचा  भारतात मन्कीपॉक्स संसर्ग चाचणी किट येणार

“महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. फडणवीस यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र भाजपा ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता,” असा उपरोधिक टोलाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून लागवलाय.

अधिक वाचा  संभाजीराजेंनी मुंबई पहाटेच सोडली; शिवसेनेची ऑफर धुडकावली?

“अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोर्टानेही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. श्रीमती राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे फडणवीस यांना तरी शोभत नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

“महागाई, बेरोजगारी, चिनी सैन्याची घुसखोरी असे अनेक ज्वलंत विषय आहेत व त्या विरोधात उभे ठाकले पाहिजे. फडणवीस या विरोधात लढायला तयार असतील तर सांगावे. शिवसेनाही त्यांच्या सोबतीला येईल, नव्हे देशाचा प्रत्येक नागरिक त्या लढ्यात उतरेल, पण दोन थेंब टोमॅटो सॉससाठी लढण्याची त्यांची भाषा महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्यास काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रावर कारवाई करावी असे फडणवीस म्हणतात, पण ते कोणत्या महाराष्ट्राविषयी बोलतात? २०१९ पासून त्यांचा महाराष्ट्राशी संबंध तुटला आहे. खरेच, आज दादा कोंडके हवे होते,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.