‘देशाला म्लेंच्छ, आंग्लवादी आणि गांधीवादी विचारांची बाधा झाली आहे. त्यावर छत्रपती हा एकच उपाय आहे. देश उभारायचा असेल तर १२३ कोटी जनतेचा रक्तगट बदलायला हवा,’ असं वक्तव्य ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. ‘व्यक्तीच्या जीवनात अनेकदा भूतबाधा होते. खाण्यापिण्यात काही कमीअधिक झालं तर विषबाधा होते. ही भूतबाधा, विषबाधा यावर उपाय आहेत. पण हिंदुस्थानला तीन बाधा झालेल्या आहेत. म्लेंच्छ, इंग्रज आणि गांधीवाद… अशा या तीन बाधा आहेत. या बाधा दूर करायच्या असतील तर छत्रपती शिवाजी महाराज हा एकच उपाय आहे. त्यांची उपासना केली पाहिजे, असं भिडे म्हणाले.

अधिक वाचा  तारक मेहता.. 'मध्ये दयाबेन परत येणार पण, दिशा वकानी होणार रिप्लेस

‘हा देश चोरांच्या ताब्यात आहे. त्यांना नेस्तनाभूत करा. या देशावर भगव्याचं राज्य स्थापन व्हायला हवं. ते काम आपल्याला करावं लागेल. चीनची पकड तोडून काढली पाहिजे. या देशाला ताकद मिळावी म्हणून देशातील सर्व समाजातील १२३ कोटी जनतेचा रक्तगट बदलला पाहिजे. त्यांचा रक्तगट शिवाजी-संभाजी केला पाहिजे, असं ते म्हणाले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी देशासाठी त्याग केला. त्यांच्या हृदयातील कण सुद्धा तुम्ही जाणत नाही. ते जाणलं असतं तर देशाचं चित्र आज वेगळं असतं, असंही भिडे म्हणाले.

संभाजी भिडे यांनी याआधीही अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. आमच्या बागेतील आंबा खाल्ल्यानं अनेकांना मुलं झाली, असं विधान एकदा त्यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळं त्यांना कोर्टाची वारी करावी लागली होती. भिडे हे समाजात अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप झाला होता. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला होता.