मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात तपास करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांच्या कामात १ कोटी ९५ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप त्यांनी कला होता. अस्तित्वात नसललेल्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देत हा अपहार केल्याचा आरोप वंचितने केला होता. आता या प्रकरणी कलम १५६/३ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी खर्च करत १ कोटी ९५ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत शिफारस करण्यात आलेली रस्त्यांची कामे डावलल्याचंही वंचितने म्हटलं होतं. जिल्हा परिषदेला डावलून मर्जीतील रस्त्यांची कामे नियमबाह्य पद्धतीने करून घेतल्याचा आरोप वंचितने बच्चू कडू यांच्यावर केला होता.

रस्त्यांची जी कामे करण्यात आली त्यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. तर तीन रस्त्यांच्या कामामध्ये बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाख रुपयांचा अपहार केला असल्याचं वंचितने म्हटलं होतं. ग्रामीण मार्ग क्रमांका नसताना या कामांना प्रशासकीय मान्यता कशी मिळू शकते असा प्रश्न वंचितने विचारला होता.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

पोलिस कारवाई होत नसल्यानं वंचितकडून अकोला जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने बच्चू कडूंविरोधातील कारवाईसंदर्भात राज्यपालांची परवानगी घेण्यास सांगितलं होतं. दरम्यान, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यावर झालेले आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज परवण्यात येत असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते.