मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी (23 एप्रिल) झालेल्या हल्ल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. हल्ल्यानंतर भाभा रुग्णालयात किरीट सोमय्या यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. किरीट सोमय्यांना मोठी दुखापत झाली नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. या अहवालात किरीट सोमय्या यांना 0.1 सेंटीमीटरची जखम असल्याचं आढळून आलं आहे. यासोबत सूज नव्हती आणि रक्तस्रावही नव्हता असं भाभा रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
सोमय्या यांच्यावर हल्ला झाला तेव्हाच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्याला झालेल्या जखमेतून रक्त येत असल्याचं दिसत होतं. तेव्हा उपचारासाठी रुग्णालयात न जाता सोमय्या हे गाडीतच बसून राहिले होते. सोमय्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकाही केली होती. चेहऱ्याला सॉस लावल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारकडून स्पॉन्सर्ड : किरीट सोमय्या
“खार रोड पोलीस स्टेशन इथे माझ्यावर झालेला हल्ला ठाकरे सरकारने स्पॉन्सर्ड केलेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पोलीस स्टेशनला येईन असं मी कळवलं होतं. त्यामुळे मी पोहोचण्यापूर्वीच 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनवर व्यवस्था केली होती. पोलीस स्टेशनच्या आवारात, पोलीस स्टेशनच्या दारापाशी जमले होते. येतानाही मला शिवीगाळ करण्याती आली. माझी गाडी थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. आणि परत जाताना मी पोलिसांना सांगितलं, हल्ला करणार आहेत. त्यावेळी त्यांनी व्यक्तीगत जबाबदारी घेतली. त्यांनी सांगितलं आम्ही सगळी व्यवस्था केली आहे. पण पोलीस स्थानकाचं दार उघडताच, बाहेर असलेल्या 70-80 गुंडांच्या हवाली माझ्या गाड्यांना करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी केलं आहे. यासाठी संपूर्णपणे पोलीस आयुक्त संजय पांडे जबाबदार आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले होते.