मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचं हिंदुत्व घंटाधारी नव्हे तर गदाधारी असल्याचं सांगत भाजपावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला असून यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान फडणवीसांच्या या टीकेला शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते –
“हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी ? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये. आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, आमच्या घरी यायचे आहे तर या…पण दादागिरी करुन याल तर दादागिरी कशी मोडायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिदुंत्वाच्या व्याख्येत सांगितल आहे,” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.

अधिक वाचा  "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?", शिवसेनेलाही लागली चिंता

फडणवीसांची टीका –
देवेंद्र फडणवीस यांनी ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, “भाषण नाही, तर कृतीत आणून दाखविणारे फार कमी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यातील आपले नेते आहेत. आजकाल ‘गदाधारी’ हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते ‘गधाधारी’ दिसते”.

संजय राऊतांचं उत्तर –
“जी गाढवं होती त्यांच्यापासून आम्ही अंतर ठेवलं आहे. आता आमच्या हातात फक्त गदा आहे,” असं उत्तर संजय राऊतांनी दिलं आहे.

अधिक वाचा  पवारांचं पुण्यात नवं समीकरण? ब्राह्मण समाजासोबत बैठकीतून हे साध्य होणार?

दरम्यान संजय राऊत यांनी यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप केला. भोंगे प्रकरण, हनुमान चालिसा प्रकरण, मुंबईमधील घडामोडी यामागे डी गँग, अंडरवर्ल्ड आणि त्यांचा पैसा काम करत असल्याचं ते म्हणाले आहेत.

फडणवीस गप्प का ?
“फडणवीस शांत का आहेत? नवनीत राणांनी जातीवरुन छळ केल्याच्या आरोपानंतर आमच्या पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ शेअर केला. त्यावर फडणवीस काही बोलले का नाहीत? इतर वेळी भाजपा नेते पोपटासारखे बोलतात. मग नवनीत राणांच्या खात्यावर जमा झालेल्या पैशांवर भाजपाने काहीही उत्तरं न देता इतरांच्या बाबतीत जी भाषा वापरली ती वापरा. आणि ईडीकडे चौकशी करण्याची मागणी केली पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले.