कराची  : पाकिस्तानातील कराची विद्यापीठ परिसरात मंगळवारी (26 एप्रिल 22) दुपारी मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 3 चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला व्हॅनमध्ये स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र काही काळानंतर या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. यामुळे हा हल्ला एका आत्मघातकी हल्लेखोर महिलेने केल्याचे स्पष्ट झाले. आता या महिलेच्या पतीने त्याला आपल्या पत्नीवर गर्व असल्याचे ट्विट केले आहे. यासोबतच आपल्या दोन्ही मुलांनादेखील तुझा अभिमान वाटेल, असंही त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उच्चशिक्षित होती दहशतवादी महिला

या हल्ल्यानंतर बलूच लिबरेशन आर्मीने  याची जबाबदारी घेतली. त्यासोबतच त्यांनी हल्लेखोर महिलेबाबत बरीच माहिती देखील जाहीर केली. बलूच लिबरेशन आर्मीने  या महिलेला आपली पहिली महिला ‘फिदायी’  म्हटलं आहे. त्यांनी जाहीर केलेल्या स्टेटमेंटनुसार, या हल्लेखोर महिलेचं नाव शारी बलूच  असं होतं. 30 वर्षांची शारी ही नझर अबाद तुर्बत भागातील रहिवासी होती. शारी उच्चशिक्षित होती, तिने झूलॉजीमध्ये मास्टर्स केलं होतं. यासोबतच तिचा एम फिलचा अभ्यास सुरू होता. यासोबतच ती एका माध्यमिक विद्यालयात विज्ञान विषय शिकवत होती. “विद्यार्थी असताना शारी ‘बलूच विद्यार्थी संघटने’ची सदस्य होती. बलूच नरसंहार आणि बलुचिस्तानचा ताबा या घटनांची तिला जाणीव होती,” असंही बलूच लिबरेशन आर्मीच्या स्टेटमेंटमध्ये  म्हटलं आहे.

अधिक वाचा  संभाजीराजेंच्या उमेदवारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "आम्हाला का..."

अफगाणिस्तानातील पत्रकार बशीर अहमद ग्वाख  यांनी या महिलेच्या पतीचं ट्विट सर्वांसमोर आणलं आहे. या महिलेचे वडील सरकारी कर्मचारी होते, तर पती एक डेंटिस्ट आहे. या घटनेनंतर तिच्या पतीने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. “शारी जान, तुझ्या या निःस्वार्थ कृत्यामुळे मी निशब्द झालो आहे. मात्र, मला तुझा अतिशय अभिमान वाटतो आहे. माहरोच आणि मीर हसन या दोघांनाही तुझ्याबद्दल गर्व वाटतो. तू कायमच आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राहशील.” अशा आशयाचे ट्विट हबितान बशीर बलूच याने केलं होतं. हिंदुस्थान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अधिक वाचा  कंगना रणौतचा बहुचर्चित ‘धाकड’ पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला‘, भुल भुलैय्या २’ ठरला सरस..

या ट्विटसोबत त्याने त्याच्या कुटुंबाचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. यामध्ये हबितान, शारी, त्यांची आठ वर्षांची मुलगी माहरोश आणि चार वर्षांचा मुलगा मीर हसन हे दिसत आहेत. उच्चशिक्षित आणि कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसलेल्या एखाद्या कुटुंबातून अशा प्रकारचा हल्ला, आणि अशा प्रकारची प्रतिक्रिया येणे हे बलुचिस्तानमधील युवा पिढीबाबत बरंच काही सांगून जातं, असं मत पत्रकार बशीर अहमद ग्वाख यांनी आपल्या ट्विट्समधून व्यक्त केलं आहे.