पुणे- मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दि. 3 एप्रिलचा “अल्टिमेटम’ दिलेला असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे होणारी सभाही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अडचणीत आले आहे.

परंतु, त्यानंतर ठाकरे सभा घेण्यावर ठाम असून ते पुणे येथे दि.29 आणि 30 एप्रिल असा दोन दिवसांचा दौरा करून औरंबादच्या सभेला जाणार आहेत. त्यामुळे औरंगाबादच्या सभेसाठी पुण्याचा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

मनसेच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज पार पडली. या बैठकीत औरंगाबाद सभेच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरही चर्चा करण्यात आली. पुणे येथे दि.3 मे रोजी होणाऱ्या महाआरती संदर्भात देखील नियोजन झालेले आहे. महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस ठाण्याला पत्र देण्याचे काम सुरू असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अधिक वाचा  केतकीचे वय बघता वॉर्निंग देऊन सोडून द्या;पंकजा मुंडेंचे शरद पवारांना आवाहन

दरम्यान, ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे खाली करण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींचा सामाजिक जीवनावरही परिणाम होताना दिसत आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी सभा असणार आहे. पण, त्याआधीच पोलिसांनी जमाबंदी लागू केली आहे.
विशेष म्हणजे औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देखील दिलेली नाही. मात्र, त्यानंतरही मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाकरे यांच्या सभेसाठी ठाम असून औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेची जोरदार तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.