मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सीआयएसएफने मुंबई पोलिसांना जाब विचारल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जशास तसं उत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांवर हल्ला होताना सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करा अशा आशयाचं पत्र मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सीआयएसएफच्या महासंचालकांना लिहिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

किरीट सोमय्यांना केंद्राची झेड सिक्युरिटी आहे. अशावेळी त्यांच्यावर हल्ला होताना त्यावेळी सीआयएसएफचे जवान कुठे होते याची चौकशी करावी अशा आशयाचं पत्र संजय पांडे यांनी लिहिलं आहे. त्यामुळे आता केंद्र विरुद्ध मुंबई पोलीस असं पुन्हा एकदा चित्र निर्माण झाल्याचं स्पष्ट होतंय. मुंबई पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्राला सीआयएसएफचे महासंचालक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  “घाबरलेला भोंगा आज महाराष्ट्राने पाहिला”; सभेनंतर शिवसेना नेत्याची प्रतिक्रिया

राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या 23 एप्रिलला खार पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. राणा दाम्पत्याला भेटायला किरीट सोमय्या आल्याचं समजल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी पोलीस स्टेशनमधून परत जात असताना किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या. यामध्ये किरीट सोमय्यांच्या गाडीची काच देखील फुटली आणि किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले.

झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीवर दोन वेळा कसा हल्ला होतोय अशा प्रकारचा जाब सीआयएसएफने मुंबई पोलिसांना विचारल्याची माहिती आहे. आता त्याला मुंबई पोलिसांनी उत्तर दिल्याचं सांगितलं जातंय.