औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या वातावरणनिर्मितीसाठी मनसेकडून टीजरसुद्धा रिलीज करण्यात आलाय. दरम्यान, आता या सभेचं आयोजन करण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. राज ठाकरेंची सभा १ मे रोजी आयोजित आहे तर औरंगाबाद पोलिसांनी २६ एप्रिल ते ९ मे या कालावधीत जमावबंदी लागू केली आहे. या आदेशामुळे सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार आहे. सण आणि संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून जमावबंदीचा निर्णय़ घेतल्याची माहिती पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

औरंगाबाद पोलिसांच्या या आदेशानंतर आता मनसेच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेचं काय असा प्रश्न निर्माण होतोय. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबत बोलताना सांगितलं की, “आम्ही सभेच्या आयोजनाची घोषणा जमावबंदीचा आदेश येण्याआधी केली होती. आता यासंदर्भात आमचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर इथं येऊन भेट देणार आहेत त्यानंतरच स्पष्ट होईल.” औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेच्या नियोजित सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. आता मनसे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी सुरुवातीपासूनच परवानगी नाकारली होती. त्यांच्या औरंगाबादमधील सभेला एक लाख लोक येतील असा दावा मनसेकडून करण्यात आला होता. तसंच मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मनसेनं याची तयारीसुद्धा सुरु केली होती. रविवारी व्यासपीठाची उभारणी करण्यास सुरुवात झाली होती.

अधिक वाचा  धर्मवीर 'पाहताना राजन विचारे अन् प्रताप सरनाईकांना डुलकी; फोटो व्हायरल

मनसेला सभेसाठी पर्यायी जागा पोलिसांकडून सुचवण्यात आली होती. मात्र त्या जागेवर सभा घेण्याचा प्रस्ताव मनसेनं नाकारला होता. तसंच कोणत्याही परिस्थिती औरंगाबादमध्ये सभा होणारच असाही पवित्रा मनसेनं घेतला होता. त्यानतंर आता लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशानंतर मनसे काय करणार हे पहावं लागेल.