पुणे : ‘किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर पुण्यात किमान दोनशे निदर्शने व्हायला हवी होती. प्रत्यक्षात किती झाली,’ असा सवाल करून ‘पुढच्या नेत्यावर होणारा हल्ला थांबवायचा असेल, तर आपल्यालाही ‘रिअ‍ॅक्ट’ व्हावे लागेल. ठोशास ठोसा असे उत्तर देण्याची तयारी ठेवावी लागेल,’ असा सल्लावजा आदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पक्षाच्या माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांना दिला.

भारतीय जनता पक्षातर्फे पुणे महानगरपालिका कार्य अहवालाचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते सोमवारी झाले. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, संघटक सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृह नेते धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  “महिन्याभर पक्षात हुकुमशाही सुरू आहे”, सभेआधी वसंत मोरेंचा दावा!

‘संघटना, विचारासाठी लढाई केली गेली पाहिजे. संघटना असेल तरच तुम्ही नगरसेवक, आमदार, मंत्री होऊ शकता. संघटना जीवंत आणि सशक्त असेल, तरच महापालिका जिंकता येईल. तुमच्यापैकी किती जणांनी संघटनेसाठी काम केले आहे?’ असा सवालही पाटील यांनी केला. ‘महापालिकेत नगरसेवक व्हायचे, ‘स’ निधी मिळवायचा एवढेच स्वप्न बाळगू नका. आपण राष्ट्रीय विचारांचे कार्यकर्ते आहोत याची जाणीव ठेवा. केवळ निवडणूक आली म्हणून खर्च करायचा असे धोरण नको. आताही नागरिकांसाठी स्वत:च्या खिशातून खर्च करा. निधी नसल्यास पक्ष संघटनेशी संपर्क करा,’ असे पाटील म्हणाले. ‘महापालिकेतील आपल्या सत्ताकाळात भाजपने उत्तम काम केले आहे. या कामाचा अहवाल घराघरापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,’ असा सल्लाही त्यांनी दिला. ‘भाजपच्या महापालिकेत पाच वर्षांच्या कार्यकाळात भरीव काम केले आहे. पुढील २५ ते ३० वर्षांचा विचार करून विकासकामांचे नियोजन केले आहे. ही कामे सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे,’ असे मुरलीधर मोहोळ म्हणाले. बीडकर, पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. दीपक पोटे यांनी सूत्रसंचालन केले. रवी साळेगावकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

‘नगरसेवक म्हणून मुदत संपली असली, तरी नागरिक म्हणून महापालिकेत जायला तुम्हाला कोणी अडवलेले नाही. तुमच्यापैकी किती जण सध्या पालिकेत जाता? तुम्ही माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता किंवा नगरसेवक कोणीही असलात तरी दिवस वाटून घेऊन तुम्ही रोज पालिकेत गेलेच पाहिजे. दररोज सात ते आठ प्रमुख पदाधिकारी पालिकेत दिसलेच पाहिजेत,’ अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली.