महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. पर्यावरण विभागाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला जाणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. हा दौरा शासकीय असला तरी आदित्य ठाकरे राजकीय भेटीगाठी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावेळी त्यांची आणि काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट होणार असल्याचंही बोललं जात आहे. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत इतर मंत्रीही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पर्यटन आणि पर्यावरण अशी दोन खाती सांभाळत असलेले आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. हा दौरा शासकीय आहे. आदित्य ठाकरे काही परिषदांमध्ये सहभागी होणार आहेत. अशातच महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अशातच या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  भारतात मन्कीपॉक्स संसर्ग चाचणी किट येणार

राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप वाद शिगेला

नवनीत राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्याच दिवशी खार पोलीस स्थानकात त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये किरीट सोमय्या गंभीर जखमी झाले. याप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक करण्यात आली.

अधिक वाचा  अन् अजितदादा विद्यार्थिनीसमोर हात जोडतात तेव्हा...

किरीट सोमय्यांनंतर आदित्य ठाकरेंचा दिल्ली दौरा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दिल्लीत काही राजकीय भेटीगाठी घेणार आहेत. यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्या दौऱ्याकडे लागल्या आहेत. राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. शिवसेना विरुद्ध भाजप वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच दिल्लीत जाऊन त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यानंतर लगेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.