मुंबई – राणा दाम्पत्यांना अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते. परंतु, शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यावरुन राज्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे.किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहसचिव अजय भल्ला यांना पत्र लिहीले आहे. त्यामुळे आणखीनच गदारोळ पहायला मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. शिवसैनिकांकडून हल्ला होऊ शकतो, त्यामुळे त्यांची गर्दी हटवावी असे सोमय्या यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यावर कार्यवाही केली नाही, असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

अधिक वाचा  कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

मुंबई पोलिसांच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षा देण्यात आली आहे. त्यानंतर देखीलही महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस गंभीर नसल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.मुंबई पोलीस हे महाविकास आघाडीचे नोकर असल्यासारखे वागत आहे, असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखीनच चिघळलं आहे.

राज्यात सध्या किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्यांमुळे जोरदार खळबळ उडाली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे.

या हल्ल्यानंतर भाजप पेटून उठलं आहे आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.