मुंबई : महाविकास आघाडीवर एकापाठोपाठ भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना मुंबईत घडली. या हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातल्या सीसीटीव्हीची तपासणी केली जाणार आहे. सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे.
किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी गृहखात्याकडून केली जाणार आहे. किरीट सोमय्या यांना झालेली जखम खरंच संबंधित हल्ल्यातून झाली की नाही याची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जखमेबद्दल पोलीस खात्याला शंका असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगड फेकले. यापूर्वीही अशाप्रकारे त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली आहे. सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. किरीट सोमय्या या हल्ल्यात जखमी झाले. तर सोमय्या यांनीच आमच्या अंगावर गाडी चढवली होती, असा दावा शिवसैनिकांनी केला होता.