‘इंडियन आयडल मराठी’ या शोने अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली. या शोमधील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. तर नुकताच या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला असून शोला पहिल्या-वहिल्या सीझनचा विजेता मिळाला आहे. तर पनवेलचा सागर म्हात्रे हा या शोमध्ये विजेता ठरला आहे.
‘इंडियन आयडल मराठी’ या शोची सुरुवात नोव्हेंबर २०२१ पासून झाली होती. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून २४ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. तर यामध्ये १४ स्पर्धकांनी आपले स्थान निश्चित केले होते. तेव्हापासून या १४ स्पर्धकांनी आपल्या आवाजाने परिक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये जगदीश चव्हाण, भाग्यश्री टिकले, प्रतीक सोळसे, श्वेता दांडेकर आणि सागर म्हात्रे हे स्पर्धेक टॉप ५ मध्ये पोहोचले होते. त्यानंतर या टॉप ५ स्पर्धकांपैकी जगदीश चव्हाण, श्वेता दांडेकर आणि सागर म्हात्रे टॉप ३ पर्यंत मजल मारली. तर या स्पर्धेत श्वेता दांडेकर ही दुसरी उपविजेती ठरली.
श्वेता दुसरी उपविजेता ठरल्याने तिला दोन लाखांचा धनादेश देण्यात आला. त्यानंतर सागर म्हात्रे आणि जगदीश चव्हाण यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. अशात या लढतीत जगदीश चव्हाण पहिला उपविजेता ठरला. तर जगदीशला तीन लाखांचा धनादेश आणि ट्रॉफी देण्यात आली.
या चुरशीच्या लढतीत सागर म्हात्रेने बाजी मारत ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या-वहिल्या सीझनचे विजेतेपद आपल्या नावे केले. सागरला इंडियन आयडल मराठीच्या विजयाच्या ट्रॉफीसोबत ५ लाखांचा धनादेश पारितोषत म्हणून देण्यात आला. सागरच्या या विजयानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.