मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा  वाचण्यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दांपत्य असा संघर्ष पेटला आहे. अखेर अपक्ष आमदार रवी राणा  आणि त्यांच्या पत्नी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी माघार घेतली आहे. या सगळ्या गदारोळात एक आजीबाई चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. शिवसैनिकांसोबत राणा दांपत्याच्या घराबाहेरील आंदोलनात या आजीबाई सहभागी झाल्या होत्या.

चंद्रभागा असं त्यांचं नाव आहे. या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा दिला. झुकेगा नही साला, असे त्या म्हणाल्या. मागील दोन दिवस रवी राणा मातोश्रीवर आमच्या वहिनींना आणि सगळ्यांना त्रास देत आहे. त्यामुळे आम्ही शिवसैनिक त्याला इंगा दाखवणार आहोत. तुझी हिंमत कशी झाली, विचारणा आजीबाईंनी केली. तू मातोश्रीवर येऊन दाखवच, असं थेट आव्हानही या आजीबाईंनी दिलं.

अधिक वाचा  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची : काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयात नेत्यांना भाजपकडून संधी?

या चंद्रभागा आजीबाईंची बातमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोचली. यानंतर त्यांनी तातडीने फोनवरून त्या आजींशी संपर्क साधला. त्यांनी आजींना थेट मातोश्रीवरच बोलावून घेतलं. त्यावेळी आजींनी मी तुमच्यासाठी इथे बसलेय, असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांची ख्यालीखुशाली विचारली. फार वेळ बसू नका, चहापाणी झालं, असंही त्यांनी विचारलं. आजींनीही साहेब जय महाराष्ट्र म्हणत तुमच्यासाठी इथेच बसणार, असंही मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितलं.

शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार राणा दांपत्याने काल (ता.22) पत्रकार परिषदेत व्यक्त केला होता. परंतु, आता शिवसैनिक अधिकच आक्रमक झाले आहेत. काल रात्रीच भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर मातोश्रीसमोरच शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यानंतर राणा यांच्या मुंबईतील खार येथील निवासस्थानासमोरील बॅरिकेडही शिवसैनिकांनी तोडले होते. या पार्श्वभूमीवर राणा दांपत्याने आता माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणाही त्यांनी केली आहे.