मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर  हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी केला होता. पण आता मातोश्रीवर जाण्याच्या निर्णयावरुन राणा दाम्पत्याची माघार घेतली आहे.

मातोश्री बाहेर आणि राणा दाम्पत्यच्या घराबाहेर शिवसैनिकांनी ठिय्या दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राणा दाम्पत्याला घरातच रोखून ठेवलं होतं.

आता माघार घेणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत दौरा आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी माघार घेत असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  ओवेसी याच्या प्रतिमेवर थुंकून पतित पावन तर्फे निषेध आंदोलन

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात अनेक अडचणी आल्या आहेत. मातोश्री आमच्या हृदयात आहेत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेही आमच्या हृदयात आहेत. आम्ही कुठलंही चुकीचं भाष्य वापरलं नाही असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मातोश्रीवर हनुमान जयंतीला हनुमान चालीसा न वाचणं, आमचा विरोध करणं आणि आज जेव्हा आम्ही शनी भगवंताचा दिवस आहे. त्या निमित्ताने आज आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला जाणार होतो, पण सकाळीच आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून घरात डिटेन करण्यात आलं असा आरोप रवी राणा यांनी केला आहे.

काही शिवसैनिकांना पाठवून मुख्यमंत्र्यांनी आमच्या घरावर हल्ला केला. रवी राणा, नवनीत राणा मारा, त्यांच्या घरावर हल्ला करा असे आदेश त्यांना होते, मुख्यमंत्रीच राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे. महाराष्ट्र हा पश्चिम बंगालच्या दिशेने जात आहे अशी टीकाही रवी राणा यांनी केली.

अधिक वाचा  अभिनेता आर. माधवनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

उद्या देशाचे पंतप्रधान जे देशाचा गौरव आहेत, ते मुंबईत येत आहेत, एक आमदार म्हणून, एक खासदार म्हणून आमचं कर्तव्य आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्रात पंतप्रधानांसारखं मोठं व्यक्तीमत्व येत आहे त्यांच्या दौऱ्याला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे, यासाठी आपण माघार घेत असल्याचं आमदार रवी राणा यांनी जाहीर केलं.