मुंबई – भाजप नेते मोहित कंबोज  यांच्या कारवर ‘मातोश्री’ परिसरात कलानगरच्या सिग्नलवर जमावानं हल्ला केल्याची घटना रात्री घडली. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात मॉब लिंचिंगची तक्रार दाखल केली आहे. मातोश्री कलानगरबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांच्या जमावानं त्यांना बळजबरीनं गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. याचा तपास करण्यात यावा, असे देखील कंबोज यांनी तक्रारीत म्हटले आहे. कलम 307,149,506(2)आयपीसी 34 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी मोहित कंबोज यांनी तक्रारीतून मुंबई पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  माधुरीच्या चाहत्यांना धक्का! अभिनय सोडून घेतला ‘हा’ निर्णय

हल्ल्याच्या घटनेनंतर मोहित कंबोज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एक लग्नाचा कार्यक्रम उरकून घरी जात होतो. कलानगरला सिग्नलजवळ माझी कार थांबली. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कारवर हल्ला केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, असं ते म्हणाले. रेकी करत असल्याच्या आरोपावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी रेकी करत नव्हतो. मी एका लग्नसोहळ्यानंतर घरी जात होतो. त्याचवेळी माझ्या कारवर हल्ला केला, असं कंबोज यांनी सांगितलं.

मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिल्यानंतर राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर कंबोज यांच्याकडून मातोश्रीची रेकी केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.

अधिक वाचा  जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण,पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला देहू नगरीत