पुणे : कोरोनाच्या भयान काळात सामान्य जनतेला बेड मिळणं मुश्किल होतं. सगळं जग लॉकडाऊनमध्ये अडकलं होतं. हाताला काम नव्हतं. त्यात कोरोना संसर्गाने जनतेला जीव मुठीत घेऊन जगावं लागलं. अशा काळात ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेऊन कोट्यवधींची बील सरकारी तिजोरीतून भरली. याच प्रकरणावर जनसामान्यांच्या उलट सुलट प्रतिक्रिया येत आहेत. याच विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी संतापून ‘माझं बील मी भरलंय, त्यांचं त्यांना विचारा’, अशी प्रतिक्रिया दिली.

तसेच म्हणाले, ज्यांनी खासगी बिलं सरकारीत लावली, त्यांना तुम्ही जाऊन प्रश्न विचारा, स्वत:चा पैसा खर्च करण्याऐवजी सरकारचा पैसा का घेतला, बाबांनो तुम्ही असं का का केलं? अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली. मात्र, पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार चिडले असल्याचं यावेळी दिसलं.

अधिक वाचा  आर्यन खान देश सोडून अमेरिकेत जाऊन राहणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, कोरोना काळातील दोन वर्षात ठाकरे सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरला. या 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल 1 कोटी 39 लाख खर्च केले.

विशेष म्हणजे, या सगळ्यांचं बील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नावावर आहे. टोपेंनी सरकारी तिजोरीतून तब्बल 34 लाख रुपये भरल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती उघड झाल्यानंतर आता महाविकास आघाडीवर विरोधी पक्ष कोणती प्रतिक्रिया देईल हे पाहणं आवश्यक राहील.

दोन वर्षात या मंत्र्यांनी उपचार घेतल्याची बिलं राज्य सरकारला सादर केली आहे. या सर्व मंत्र्यांच्या उपचारापोटी शासनाने 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रुपये भरले आहेत. सरकारी नियमानुसारच हे बील भरण्यात आलं आहे. अशी माहिती समोर आली आहे.