मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. यादरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी आक्रमक पवित्रा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाची घोषणा केली होती. त्यासाठी राणा दाम्पत्य शुक्रवारी पहाटे मुंबईत दाखल झाले होते.

मुंबईतील खारघर या निवासस्थानी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुक्काम ठोकला होता. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांना यासंदर्भात नोटीस देखील बजावली होती. तरी देखील राणा दाम्पत्य मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणावर ठाम होते. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना विरोध करण्यासाठी शिवसैनिक कालपासून नवनीत राणा यांच्या खारघर येथील घरासमोर ठाण मांडून होते.

अधिक वाचा  अभिनेता पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल, शिक्षण क्षेत्रात खळबळ

कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी शुक्रवारपासून मोठया प्रमाणावर पोलीस फौजफाटा नवनीत राणा यांच्या घराजवळ तैनात करण्यात आला होता. तसेच बॅरीगेट देखील उभारण्यात आले होते. पण शिवसैनिकांनी आक्रमक होत पोलिसांनी उभारलेले बॅरीगेट हटवले आणि राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला.

यामुळे पोलिसांचा गोंधळ उडाला. सुमारे २५० ते ३०० शिवसैनिकांनी पोलिसांचा वेढा तोडत बॅरीगेटवर चढले. त्यानंतर शिवसैनिकांनी नवनीत राणा यांच्या घरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन देखील केले.

अनेक शिवसैनिकांनी कालपासून मातोश्रीसमोर गर्दी केली आहे. शिवसैनिक तेथून हालचाल करण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर असणाऱ्या शिवसैनिकांशी काल संवाद साधला. “तुम्ही घरी जा, मातोश्रीवर यायची कोणाची हिंमत नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले .

अधिक वाचा  आता विधवांनाही सन्मान; 'हेरवाड ग्रामपंचायतीचा पॅटर्न' राज्यभर

शिवसैनिक राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर भजन -कीर्तन म्हणत त्यांच्या विरोध करत आहेत. आम्हाला हिंदुत्व कोणी शिकवू नये. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीजवळ येण्याचा प्रयत्न देखील करू नये. जर त्यांनी मातोश्रीजवळ येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठाकरे स्टाइलमध्ये उत्तर देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे.