पुणे – राजकीय वरदहस्त असल्याने राजारामपूल ते म्हात्रेपूल या डीपी रस्त्यावर मंगल कार्यालये तसेच हॉटेल्सने अतिक्रमणे केली होती. पण, पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाने येथे थेट बुलडोझर चालवला.

या कारवाईनंतर प्रशासनावर प्रचंड दबाव वाढला असून, राज्यातील एका बड्या नेत्याकडे महापालिका आयुक्तांची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार शनिवारी या परिसरात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई जिव्हारी लागल्याने ही तक्रार करण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

डीपी रस्त्यावरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याच्या माहितीस आयुक्त विक्रम कुमार यांनी दुजोरा दिला. मात्र, कारवाईवरून आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अतिक्रमण असले तरी त्याला वीज, पाणी, ड्रेनेज या सुविधा कशा मिळतात? अतिक्रमण कारवाई झाल्यानंतर मोठ्या अतिक्रमणांना नळजोड तसेच ड्रेनेजच्या सुविधा कोणी दिल्या? याची तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कारवाईत कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचा पुनरुच्चार कुमार यांनी केला.

अधिक वाचा  "काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळं तरी कुठे लावणार?", शिवसेनेलाही लागली चिंता

प्रशासक नियुक्‍ती होताच महापालिका आयुक्तांनी अतिक्रमणांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे. राजकीय हस्तक्षेप न जुमानता ही कारवाई सुरू आहे. त्यात, बुधवारी प्रशासनाने डीपी रस्त्यावर कारवाई केली. येथे गेल्या 20 ते 22 वर्षांपासून राजकीय हस्तक्षेप राहिला आहे. ही कारवाई करताना अतिक्रमणधारक न्यायालयात जाण्याची शक्‍यता लक्षात घेऊन, पालिकेने आधीच कॅव्हेट दाखल केले होते. त्यामुळे प्रशासनास व्यवस्थित कारवाई करत सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करता आली. मात्र, ही कारवाई काही ठराविक हॉटेल मंगल कार्यालये व हॉटेलवर झाली असून, या कारवाईत भेदभाव झाल्याची तक्रार प्रशासनावर वचक असलेल्या एका नेत्याकडे करण्यात आली. तसेच या कारवाईवरून काही राजकीय नेत्यांनी महापालिका प्रशासनावर आखपाखड केली. आयुक्‍तांबद्दल झालेल्या तक्रारीनंतर प्रशासकीय अधिकारी बॅकफूटवर आले असून, आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  ठाकरेंचे दुसरे 'खास' राज्यसभेवर? मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा