भारतीय कुस्तीपटू अंशू मलिक आणि राधिका यांनी शुक्रवारी आशियाई कुस्ती स्पर्धेत आपापल्या 57 किलो आणि 65 किलो गटात रौप्य पदक जिंकले आहे. तर मनीषाने 62 किलो गटात कांस्यपदक (Bronze medal) पटकावले. कुस्तीपटू अंशू मलिकने अंतिम फेरीत प्रवेश केला, परंतु 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत तिला जपानच्या त्सुगुमी साकुराईकडून 0-4 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे अंशूला सुवर्णपदकापासून वंचित राहावे लागले.

अंशू मलिकने 2021 च्या आशियाई चॅम्पियनशिप 57 किलो कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. शुक्रवारी तिला गेल्या वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. जपानी कुस्तीपटू साकुराईने चांगली कामगिरी करत खेळ संपेपर्यंत 4-0 अशी आघाडी घेतली. मलिकला यावेळी एकही गुण मिळवता आला नाही. त्यामुळे तिचा पराभव झाला.

अधिक वाचा  खाद्यतेलानंतर आता साखर होणार स्वस्त! .. कारखान्यांना बसणार फटका

कुस्तीपटू राधिकाने 65 किलो वजनी गटात तिच्या चारपैकी तीन लढती जिंकून रौप्य पदक जिंकले. जपानच्या मिया मोरीकावाविरुद्धचा एकमेव सामना तिने गमावला. दुसरीकडे मनीषाने 62 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या हॅनबिट लीचा 4-2 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. यापूर्वी, सरिता मोर आणि सुषमा शोकीन यांनी आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये त्यांच्या संबंधित महिलांच्या फ्रीस्टाइल वजन गटात भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते.

टोकियो ऑलिम्पिक पदक विजेते रवी कुमार दहिया आणि बजरंग पुनिया यांच्यासह भारतीय पुरुष कुस्तीपटूं शनिवारी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.