पुणे : पीएमपीच्या ताफ्यात अतिरिक्त बस असल्याने आता यातील सुमारे २५० ते ३०० बस थेट इतर महापालिका व खासगी कंपन्यांनाच भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातून पीएमपीला उत्पन्न मिळून त्यांची संचलनातील तूट कमी होईल असा दावा केला जात असला तरी आणीबाणीच्या काळात किंवा बस ठेकेदारांनी संप केल्यानंतर पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीएमपीच्या बसेस सोलापूर व कोल्हापूर महापालिकांना भाड्याने दिल्या जाणार आहेत.

पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायरण मिश्रा आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पीएमपीच्या ठेकेदारांनी थकीत रक्कम मिळावी यासाठी अचानक संप पुकारल्याने तब्बल ६५० बसेस जागेवरच थांबल्या.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

विक्रम कुमार म्हणाले, ”पीएमपीच्या ताफ्यात २०० इ बस येणार आहेत, या लहान बस शहराच्या मध्यवर्ती भागात फिरवता येतील. पीएमपीच्या ताफ्यात २५० ते ३०० बसेस अतिरिक्त होत आहेत, त्यामुळे पीएमपीच्या स्वतःच्या सीएनजी बस इतर महापालिकांना भाड्याने दिल्या जातील, त्यातून उत्पन्न मिळेल. तर पुण्यातील आयटी कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे. पीएमपीला दोन्ही महापालिका संचलन तूट देत असल्या तरी उत्पन्न वाढीसाठी पर्याय शोधले जात आहे, त्यामधूनच या बस भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपी डेपो विकसित करणे, पीएमपीमधून उत्पन्न मिळविणे यासह इतर प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत.

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

जिल्ह्यातील सेवा बंद करणार

एसटी संपाच्या काळात पीएमपीने पुणे जिल्ह्यातील बस फेऱ्या वाढविल्या, काही नवीन मार्ग सुरू केले होते. आता एसटीचा संप संपल्याने या पीएमपीच्या बसेसची सेवा टप्प्या टप्प्याने बंद करण्यात येणार आहे, असे पीएमपीचे अध्यक्ष मिश्रा यांनी सांगितले.