मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी मशिदींसमोर ‘हनुमान चालिसा’ लावण्याची घोषणा केल्यानंतर हिंदुत्ववादी पक्ष संघटनांनी त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या खासदार नवनीत राणा  व आमदार रवी राणा  या दाम्पत्यानं तर थेट मातोश्रीबाहेर ‘हनुमान चालिसा’ पठण करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर वादाला तोंड फुटलं आहे. आपला शब्द खरा करून दाखवण्यासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक इशारा दिला आहे.

मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘रामजन्मोत्सव किंवा हनुमान चालिसा आमच्या श्रद्धेच्या, भावनेच्या गोष्टी आहेत. हे नौटंकीचे किंवा स्टंटचे विषय नाहीत. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज आम्हाला वाटत नाही. कोणाला स्टंट करायचे असतील तर स्टंट करू द्या. या स्टंटनं आम्हाला काहीही फरक पडत नाही. शिवसैनिकांना अशा स्टंट्सचा अनुभव आहे. मुंबईचे पोलीस व शिवसैनिक सक्षम आहेत. बंटी आणि बबली मुंबईत आले असतील, तर हरकत नाही. ही स्टंटबाजी आहे, हे फिल्मी लोक आहे. स्टंटबाजी किंवा मार्केटिंग करणं त्यांचं काम आहे. जे करायचं ते त्यांना करू द्या. त्यांना मुंबईचं पाणी अजून माहीत नाही, असं राऊत म्हणाले.

अधिक वाचा  शरद पवार यांच्या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही...ब्राह्मण महासंघाचा दावा

संजय राऊत यांनी यावेळी भारतीय जनता पक्षावरही निशाणा साधला. ‘अलीकडं भाजपनं हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंट करून ठेवला आहे. त्यातली ही सगळी पात्र आहेत. लोक यांना गांभीर्यानं घेत नाहीत. मुंबई, महाराष्ट्रात आम्ही सगळे सण-उत्सव साजरे करतो. यांचा जेव्हा हिंदुत्वाशी संबंध नव्हता तेव्हापासून मुंबईत आम्ही शोभायात्रा काढतो. रामजन्मोत्सव साजरा करतो. हे आम्हाला काय शिकवतायत? भाजपला सध्या मार्केटिंगसाठी अशा सी ग्रेड फिल्मस्टार्स, स्टंटबाजांचा वापर करून घेतोय. त्यांची चिंता करण्याची गरज नाही,’ असं संजय राऊत म्हणाले.