राज्याच्या काही भागांत लोडशेडिंग सुरू झालं आहे, अशी जाहीर कबुली ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काल दिल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. तापमानाचा पारा वाढत असतानाच लोडशेडिंग होत असल्यामुळं सर्वसामान्यांमध्येही नाराजी आहे. त्यामुळं सरकारी पातळीवरही लोडशेडिंग टाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी आज या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.

‘उन्हाची तीव्रता वाढल्यानं विजेची मागणी एकदम वाढली आहे. त्यातच देशभरात सगळीकडं कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील वीज निर्मिती केंद्रावर फारच कमी कोळसा शिल्लक आहे. तो वाढवून द्या, अशी विनंती केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाला करण्यात आली आहे. त्याशिवाय, मार्केटमध्ये जिथं जिथं वीज उपलब्ध आहे, ती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानं मुभा दिलीय. लवकरात लवकर गरजेनुसार वीज खरेदी केली जाईल. भारनियमन होणार नाही अशी खबरदारी घेतली जाईल. यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वासही अजित पवार यांनी बोलून दाखवला.

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

राज्यात भारनियमन होऊ नये म्हणून जी खबरदारी घ्यायला पाहिजे, ती सर्व काळजी घेतली जात आहे. वीज टंचाईच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मंगळवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आता ते दर आठवड्याला आढावा घेणार आहेत. ज्या सूचना दिल्या आहेत, त्यांचं तंतोतंत पालन होते आहे का?, हे पाहिलं जाणार आहे. नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव व इतर अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. यात वीज टंचाईच्या संकटावर सविस्तर चर्चा झाली. दुसऱ्या दिवशीच्या मंत्रिमंडळात सर्व काही माहिती देण्यात आली. सर्वांनीच यात गांभीर्यानं लक्ष घातलेलं आहे, असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  पुण्यातही ज्ञानवापी? शेख सल्लाहुद्दिन दर्ग्याची सुरक्षा वाढली, फौजफाटा तैनात

सांगलीतील एका मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. ब्राह्मण महासंघानं त्यांच्या वक्तव्यास आक्षेप घेतला असून माफीची मागणी केली आहे. त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते भडकले. ‘अमूक एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, त्याच्याबद्दल मला कशाला विचारता? मी याआधीही पत्रकारांना हे सांगितलंय. मला विकासकामांबद्दल विचारा. त्यावर बोलतो. ते जमत नसेल तर यापुढं तुमचा माईक दिसला की बोलणंच बंद करेन,’ असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला.