मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी एसटी कर्माचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घरावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी आणखी एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. हिंसक आंदोलन करणाऱ्या आंदोलकांमध्ये आणखी तीन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना लक्ष्य करण्याचा कट असल्याचा असा दावा पोलिसांनी मुंबई सत्र न्यायालयात लेखी म्हणण्याद्वारे केला आहे.

आंदोलकांच्या जामीन अर्जांना विरोध दर्शवताना पोलिसांनी ही माहिती दिली. ‘एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाचे नेतृत्व करणारे व हिंसक आंदोलनाच्या कटात सहभागी असलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते; तसेच हिंसक आंदोलन करणारे ११५ कर्मचारी मोठ्या कटाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये,’ अशी विनंतीही पोलिसांनी आपल्या उत्तरात केली आहे.

अधिक वाचा  राणा दाम्पत्याला झटका, BMC ची नोटीस,अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

सदावर्ते यांनी अॅड. गिरीश कुलकर्णी यांच्यामार्फत, तर ११५ कर्मचाऱ्यांनी अॅड. नितीन सेजपाल यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यात उत्तरादाखल पोलिसांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्यामार्फत लेखी म्हणणे मांडले. ‘.

सदावर्ते यांनी अटकेनंतर पोलिसांसमोर जबाब देताना आपण संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची कोणताही मोबदला न घेता न्यायालयात बाजू मांडल्याचे म्हटले; परंतु, प्रत्यक्षात त्यांनी प्रत्येक संपकरी एसटी कर्मचाऱ्याकडून वर्गणी घेतली. ९० हजारहून अधिक कर्मचाऱ्यांकडून सुमारे दोन कोटी रुपये जमवल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या एका संपकरी कर्मचाऱ्याने आपण कर्मचाऱ्यांकडून ८५ लाख रुपये जमवून सदावर्ते यांना दिले, असे जबाबात म्हटले आहे.

अधिक वाचा  नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही D गँगशी संंबंध का? - सोमय्या

आज होणार सुनावणी

जामीन अर्जांवर गुरुवारी वेळेअभावी सुनावणी होऊ शकत नसल्याने शुक्रवारी (आज) सुनावणी घेण्याचे न्या. आर. एम. सदराणी यांनी निश्चित केले; परंतु, विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना सकाळच्या वेळेत पनवेलमधील अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहायचे असल्याने न्यायाधीशांनी त्यांना दुपारच्या सत्रात युक्तिवाद करण्याची मुभा दिली, तर अर्जदारांच्या वकिलांना सकाळच्या सत्रात युक्तिवाद करण्यास सांगितले.