नवी दिल्ली : काही दिवसांपासून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे. प्रशांत किशोर हे आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. गेल्या चार दिवसांत प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. यापूर्वी किशोर यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबतची प्रशांत किशोर यांची प्रस्तावित बैठक गांधी कुटुंब आणि पीके यांच्यातच होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते सचिन पायलटही हे गुरुवारी दिल्लीत पोहोचले असून त्यांनीही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.

अधिक वाचा  दिलीप वळसे पाटीलांचा अपघात, हात फॅक्चर, खुब्यालाही मार

काँग्रेसने काय करावे याबाबत मोठ्या प्रमाणात यापूर्वी प्रशांत किशोर यांनी सादरीकरण केले आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या आखलेल्या रणनीतीवर पक्षांतर्गत विचारमंथनही होणार आहे. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांसमोर पुढील लोकसभा निवडणुकीची ब्लू प्रिंटही पीकेनी शनिवारी सादर केली होती. अनेक वरिष्ठ नेत्यांनी किशोर यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल, प्रियांका गांधी आणि अन्य काही नेते उपस्थित होते. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीवर सध्या काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे.

अधिक वाचा  महायुतीचे एकमत हा फॉर्म्युला? भाजप सर्वाधिक जागी मित्रपक्ष भाजप कोट्यातून राष्ट्रवादीला 5 तर शिवसेनेला…

काँग्रेसने लोकसभेच्या सुमारे 370 जागांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये युती करून निवडणूक रिंगणात उतरावे असेही पीकेंनी सुचविले आहे. बिहार, उत्तर प्रदेश, आणि ओडिशासारख्या काही राज्यांमध्ये काँग्रेसने आपल्या रणनीतीवर फेरविचार करावा आणि या राज्यांमध्ये युती टाळावी, असा सल्ला त्यांनी दिल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या तिन्ही गांधींसोबत प्रशांत किशोर यांच्या अनेक चर्चांच्या फेऱ्या झाल्या होत्या. राहुल गांधींच्या घरी जाणाऱ्या फोटोंवरुन पीके काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा पीके काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.