मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त घेतलेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि शरद पवार हे जातीयवादाचे राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख खाज ठाकरे म्हणून केला होता. त्याचसोबत त्यांनी इस्लामपूरच्या सभेत हनुमान चालिसाचे पठण करुन दाखवले, पण यावेळी त्यांनी हिंदू धर्मातील कन्यादान प्रथेवरही भाष्य केले आहे. त्यामुळे राज्यभरात एकच वाद निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, बृजभूषण सिंहांनी केले हे विधान..

अमोल मिटकरींच्या वादग्रस्त विधानानंतर ब्राम्हण संघटनांनी त्यांना विरोध करत त्यांच्याविरोधात आंदोलन केले. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे यांना अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी प्रतिक्रिया देत ते म्हणाले, मिटकरी यांनी केलेले वक्तव्य एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या खेदजनक आहे.

तसेच अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं आहे. ते त्यांचे व्यक्तिगत भाष्य आहे. राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलत नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वत:चा अनुभव सांगितला आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी अमोल मिटकरी यांच्या या प्रकरणातून हातवर केले आहे.

अधिक वाचा  राज्यातही ओबीसींना आरक्षण; बांठिया समितीचे काम अंतिम टप्प्यात - अजित पवारांची ग्वाही

जात पात धर्म हे आमच्या अंगालाही शिवले नाही. ते जे बोलले ते वैयक्तिक बोलले. अमोल मिटकरीच याबाबत स्वत: स्पष्टीकरण देतील, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी ब्राम्हण महासंघाने पुण्यातील राष्ट्रावादीच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केली. तसेच मिटकरींनी माफी मागावी अन्यथा घरात घुसू असा इशाराही दिला होता.