बार्शी : बार्शीचे सुपुत्र जवान गोरख हरिदास चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये वीरमरण आले आहे. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. चव्हाण आपल्या मृत्यूपूर्वी वास्तुशांती निमित्त घरी येण्याची तयारी करत होते. याबाबत त्यांनी आपल्या मुलांना देखील माहिती दिली होती.

शेवटचे व्हिडिओ काॅलवर बोलत असताना, ‘बाळा आपल्या नवीन घराची वास्तुशांती आहे, मी दहा तारखेला येतो. रडायचं नाही… बरं का, मी येताना तुला खाऊ घेऊन येतो…’ असे चव्हाण यांनी आपल्या मुलांना समजावून सांगितले होते. मात्र त्यांची ही इच्छा आता अपूर्ण राहिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांच्या मृत्यूची माहिती मंगळवारी सकाळी ८ वाजता त्यांच्या पत्नीला समजली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे व्हिडिओ चव्हाण कुटुंबाला पाठवून दिले होते. ते पाहून गोरख चव्हाण यांच्या पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना आपले अश्रू अनावर झाले.

अधिक वाचा  शिरूर-हवेलीतील पाच गावांसाठी लवकरच ‘गूड न्यूज’! ; आमदार अशोक पवारांची मागणी मान्य

यानंतर गोरख चव्हाण यांच्या निधनाची बातमी गावभर पसरली. सध्या गावकरी या घटनेवर हळहळ व्यक्त करत आहेत. बुधवारी चव्हाण यांचे पार्थिव रातंजनमध्ये आणले जाणार आहे. यावेळी संपूर्ण गावकऱ्यांसोबत अधिकारी ,पदाधिकारी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान गुजरात, जम्मू-काश्मीर, छत्तीसगड येथे सेवा बजावल्यानंतर गोरख चव्हाण उत्तराखंड येथे मालवाहतूक वाहनावर दाखल झाले होते. गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ते आपल्या घरी येऊन गेले होते. नुकतेच त्यांच्या नवीन घराचे बांधकाम देखील सुरू करण्यात आले होते. गोरख चव्हाण व्हिडिओ कॉलद्वारे घराचे चालू बांधकाम पाहत असे.

यंदा ते गृहप्रवेश करण्याकरिता १० तारखेला गावी येणार होते. परंतु मंगळवारी मध्यरात्री सैन्याच्या अत्यावश्यक वस्तू मालवाहतूक वाहनातून घेऊन येण्यासाठी गोरख चव्हाण यांना पिथोरागडच्या घाटात जावे लागले. याठिकाणी गेल्यानंतरच गोरख यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि ते आपल्या सहकाऱ्यांसोबत दरीत कोसळले. या दुर्घटनेत गोरख चव्हाण यांना वीरमरण आले आहे.