पुणे : ब्राह्मण संघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलं आहे. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ब्राह्मण महासंघाने जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.

ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते गुरुजींच्या वेशात आले होते. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत असल्याचं दिसताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि यातूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत आहे. अमोल मिटकरींनी विविध मंत्रोच्चार जसे की हनुमान स्तोत्र, कन्यादान विधी आदींचे मंत्र उच्चारून खिल्ली उडवली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आपले हास्य आवरले नाही.

अधिक वाचा  तारक मेहता.. 'मध्ये दयाबेन परत येणार पण, दिशा वकानी होणार रिप्लेस

अमोल मिटकरींचं ते भाषण
अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. मी एका लग्नात गेलो होतो. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते,’मम भार्या समर्पयामी’. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. अरे येड्या ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा, आरारारा… कधी सुधारणार. असं मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, मी कोणत्याही समाजाचा उल्लेख केला नाही. भाषणात मी अपशब्द वापरले नाहीत.

मी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही

अधिक वाचा  आर्यन खान देश सोडून अमेरिकेत जाऊन राहणार?

माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाहीये. मी कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला,असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलनाविरोधात दिलंय.

अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद सभेत भाषण करताना पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ब्राह्मण समाजाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.