मुंबई : मशिदींवरचे अजानचे भोंगे काढले नाहीत तर आम्ही त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू अशा आशयाचं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्या दिवशीच्या सभेत केलं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ माजली. हे भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरेंनी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला होता. त्यामुळे ३ मे रोजी होणार काय, याकडे राज्याचं लक्ष आहे. त्याबद्दलच आज पत्रकार परिषद घेत मनसेने माहिती दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सकाळीच ट्वीट करत वातावरण निर्मिती केली होती. आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेत मोठी घोषणा..मोठ्ठा ‘आवाज’ होणार आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. आता हा कोणता आवाज असेल याचा खुलासा झाला आहे.
मनसेक़डून ३ मे रोजी ‘भोंगा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. तर संदीप देशपांडे म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परवानगीनेच हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. 3 मे रोजी मनसेच्या वतीने राज्यभरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, 3 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. कोणतेही शुभ काम या दिवशी करतात. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हाच मुहूर्त निवडल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना अमोल कागणे म्हणाला की, ‘राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘भोंगा’ चित्रपट येत्या 3 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे याचा विशेष आनंद होत आहे, अजाणाची आशयघन कथा सर्व लोकांपर्यंत पोहचावी म्हणून हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करत आहोत.
‘भोंगा’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेता सिनेमा, फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक 2022, इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म, पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, सोशल फिल्म अँड स्टोरी हे पुरस्कार मिळाले आहेत.