पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जावयाने आपल्या सासऱ्याची धारदार चाकूने निर्घृण हत्या केली आहे. कपड्याच्या दुकानात शिरुन जावयाने सासऱ्याला चाकूने भोसकलं. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक कुडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यांच्यातील वादाचं प्रकरण कोर्टात सुरू आहे. वाद झाल्याने पत्नी माहेरी गेली आणि नांदायला येत नव्हती. याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता.

अधिक वाचा  वैष्णव मांदियाळीला कैक अडथळे; परी मनी आस पाहू रूप तुझं सावळे...

न्यायालयात तारखेला हजर राहिल्यानंतर कुडले आणि उत्तरकर यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. अखेर न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर जावई अशोक कुडले याने रागाच्या भरात थेट दुकानात जाऊन सासरे रमेश उत्तरकर यांच्यावर चाकूने सपासप वार केले. सासऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अशोकने थेट त्यांच्या छातीतच चाकू भोसकला. हा हल्ला एवढा भीषण होता की, रमेश उत्तरकर यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, हा खुनाचा सगळा थरार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झाला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की, अशोक कुडले याने कशाप्रकारे आपल्या सासऱ्यांची हत्या केली आहे. सध्या पुणे पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.