मुंबई: राज्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीच्या निर्णयाला गृहमंत्रालयाने ऐनवेळी स्थगिती दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. यामागील खरे कारण आता समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे दिलीप वळसे-पाटील यांना अखेरच्या क्षणी पोलीस बदल्यांच्या आदेशाला स्थगिती द्यावी लागली यावरून महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

गृहमंत्रालयाने बुधवारी रात्री ३७ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीचा आदेश काढला होता. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक आणि उपायुक्तांसह पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली गेली होती. मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात न घेतले गेल्याने एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले. याविषयी बोलण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी वळसे-पाटील यांनाही फोन केला होता. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली, असे सांगितले जाते.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

नेमका काय घडले ?

गृहमंत्रालयाकडून बुधवारी रात्री बदल्यांचे जे आदेश काढण्यात आले त्यामध्ये मुंबई आणि ठाणे परिसरातील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश होता. पोलीस अधिकारी महेश पाटील, राजेंद्र माने, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे या पोलीस अधिकाऱ्यांची मुंबई, मीरा-भाईंदर हद्दीत बदली करण्यात आली. एकनाथ शिंदे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या परिसरात पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे होती. गृहमंत्रालयाने पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, गृहखात्याने परस्पर आदेश काढल्याने एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे समजते.