मुंबई : कथित आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटकेपासून हंगामी दिलासा मिळाल्यानंतर न्यायव्यवस्थेबाबत शंका निर्माण करणारी विधाने केल्याबद्दल इंडियन बार असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात न्यायालय अवमान याचिका केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत जाहीर विधाने करण्यासह दैनिक ‘सामना’मध्ये अग्रलेखही लिहिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व दैनिकाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्यावर, तसेच राऊत यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर न्यायालय अवमान कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

‘किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार उघडकीस आणले. सध्या या आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी राहिलेले दोन नेते अनिल देशमुख व नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. सोमय्या यांचा कथित आयएनएस विक्रांत निधी घोटाळा राऊत यांनी उघड केला. त्या प्रकरणात त्यांना सोमय्या यांची अटक अपेक्षित होती, हे उघड आहे. मात्र, उच्च न्यायालयाने १३ एप्रिल रोजी सोमय्या यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर राऊत यांनी न्यायालयाबद्दलच आक्षेपार्ह विधाने केली’, असे याचिकादारांनी याचिकेत म्हटले आहे. ‘अंतरिम जामीन दिला म्हणजे तो भ्रष्टाचारमुक्त झाला, असे नाही. पुरावा म्हणजे काय? पैसे गोळा केलेत, राजभवनात पोहोचले नाहीत. हे राजभवन सांगते आहे. लोकांचा न्यायालयावर विश्वास का राहिला नाही? यामुळेच, असे ट्वीट राऊत यांनी १३ एप्रिल रोजी केले. त्यानंतर १४ एप्रिल रोजी अनेक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत अशा आशयाची विधाने केली.

अधिक वाचा  सलमानने कंगनाला संजय लीला भन्साळींकडे पाठवले तेव्हा ते म्हणाले, "तु तर..."