पुणे : पुण्यातील सहकार नगर परिसरात काही दिवसांपूर्वी हातात कोयते आणि तलवारी घेऊन गुन्हेगारांनी दहशत पसरवल्याची घटना घडली होती. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड केली होती.

या घटनेला काही दिवस होतात न होतात तोच याच परिसरात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 19 आणि 16 वर्षीय तरुणांनी हातात धारदार शस्त्र घेऊन ‘या वस्तीचा दादा मीच’ म्हणत दहशत पसरवत गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार घडला. बुधवारी दुपारच्या सुमारास धनकवडी येथील शंकर महाराज वसाहत परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी कृष्णा सुभाष वैराळ (वय 19, रा. दिग्विजय कॉलनी, लेन नं 4, संतोष नगर कात्रज) त्याच्यासह एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महाराज वसाहत परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

अधिक वाचा  सत्ता आल्यास EVM वर बंदी काँग्रेसचा मोठा निर्णय; देशव्यापी यात्रा निघणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यापूर्वी एकमेकाच्या घराशेजारी राहत होते. बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला “मला घाबरून राहायचे, मी या वस्तीचा दादा आहे, आत्ताच तुला संपवून टाकतो” असे म्हणून हातातील लोखंडी हत्याराने फिर्यादीवरून वार केला. परंतु हा वार चुकून फिर्यादी घरात पळून गेले. त्यानंतर आरोपीने या परिसरात असणाऱ्या पाच दुचाकी आणि एक चार चाकी गाडीची तोडफोड केली. त्यानंतर हातातील हत्याराचा धाक दाखवून मोठमोठ्याने आरडाओरडा करत “मीच इथला दादा आहे” असे बोलून दहशत निर्माण केली. त्याचा हा रुद्रावतार बघून वस्तीतील नागरिक लपून बसले होते.