गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील वडगाममधून मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आसाममध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज त्यांना गुवाहाटीमध्ये नेण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे.

आमदार जिग्नेश मेवाणी यांना पालनपुर सर्किट हाऊसमधून बुधवारी रात्री अटक केली. अटक केली तेव्हा त्यांना एफआयआरची प्रत पोलिसांनी दाखवली नसल्याचे जिग्नेश मेवाणी यांच्या टीममधील एकाने सांगितले. मात्र, दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. मेवाणी यांना रात्रीच अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. मेवाणी यांना आज, गुरुवारी गुवाहाटी नेण्यात येणार आहे.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

जिग्नेश मेवाणी यांनी काय म्हटले?

जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, एका ट्वीटमुळे अटक करण्यात आली. पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून मी घाबरणार नाही. मी माझी लढाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेस कार्यकर्ते संतप्त

मेवाणी यांना अटक केल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्ते, मेवाणी समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह अनेक आमदार अहमदाबाद विमानतळावर पोहचले. त्यांनीदेखील जिग्नेश मेवाणींच्या समर्थनात आणि आसाम पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

जगदीश ठाकोर यांनी सांगितले की, जिग्नेश यांच्याविरोधात आरएसएसविरोधात ट्वीट केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका आमदाराला धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा तक्रारींना जिग्नेश मेवाणी अथवा काँग्रेसदेखील घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी म्हटले.